नशिराबाद (ताजि-जळगाव) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे, वाकी नदीच्या काठी श्री झिपरू अण्णा महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. तसेच बाहेरगावच्या भक्तगणांसाठी भक्तनिवासात राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे. जुन्या समाधी स्थळाचा सन २००३ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला व अधिक प्रशस्त व भव्य सभामंडपाचे काम करण्यात आले.
श्रींच्या मंदिराचे उत्तरेस कै. श्री. दत्तात्रय गोविंद मोहरीर महाद्वार आहे. त्यासमोरील रस्त्यावर जळगावचे गणपती स्टोअर चे मालक श्री गणपतराव वाणी यांनी सिमेंट कोन्क्रीट केलेले आहे. स्व. श्री. नानाभाई मेहताचे वंशज व श्रीमती नर्मदाबेन कनकदास गोरदिया, त्यावेळचे नशिराबादचे ग्रामदवाखाना प्रमुख मंडळाचे आर्थिक साह्याने तसेच अन्य भक्तांच्या देणगीतून श्री भक्तनिवासाचे काम झाले आहे.
श्री महिला मंडळाने श्री अण्णांची मूर्ती जयपूरहून आणून समितीस दिली. याकामी डॉ. मुन्गड यांच्या सुविद्य धर्म पत्नी कमलाताईंनी जयपूरहून मूर्ती घडवून घेणेसाठी वर्गणी गोळा करून हे धर्मकार्य केले. श्री अण्णांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कानळदा येथील कन्वाश्रमाचे तपोनिष्ठ स्वामी श्री चंद्रकिरणजी यांचे शुभहस्ते गुरुवार माघ व. ३ दि १५ फेब्रुवारी १९७९ रोजी उत्तरा नक्षत्रावर करण्यात आली. यावेळी गावातुन मूर्तीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणुक श्री लिंगायत समाजाच्या मठाजवळ आली तेव्हा कडक उन होते. परमेश्वराने पाऊस पाडून श्री अण्णांचे मूर्तीवर अभिषेक केला. श्री पंढरीनाथ दगडु भोळे यांना श्री अण्णांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व सांगितले कि माझे गुरु श्री कल्याणदास महाराज यांची समाधी बांध. त्याप्रमाणे त्यांचे पुतणे, सचिन भानुदास भोळे यांनी सदर समाधी दि २८ मार्च १९९२ रोजी बांधली. श्रींच्या समाधीच्या दर्शनासाठी स्वामी मुक्तानंद हे २-३ वेळेस येऊन गेलेत. धरणगावचे डॉ. श्री. नारखेडे यांनी श्री मुक्तानंद स्वामींस हत्ती अर्पण केला. त्यावेळी स्वामीजी श्रींच्या समाधीच्या दर्शनास आले होते. त्यावेळी ४०-५० युरोपीयन भक्तही बाबांच्या बरोबर आलेले होते. त्यादिवशी श्रींच्या समाधीची पुजा-अर्चा, आरतीनंतर झालेल्या सभेत श्री स्वामीजींनी जाहीर केले कि, मंदिराचे काम व श्री भक्तनिवासाचे काम मीच करीन. ते अनंतात विलीन झाले. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न व इच्छा त्यांच्या शिष्यांनी पूर्ण केली. सन २००३ मध्ये स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला.