श्री गणपती देवस्थान, तरसोद

श्री गणपती देवस्थान, तरसोद या मंदिराचा परिसर जणू एखाद्या सिद्ध-महात्म्याचा आश्रम. गुरुदेव टागोरांच्या शांतीनिकेतनची शांती येथे प्रत्ययास येते. गीतांजलीतील मधुर स्वर कानी येतात. गुरुदेव ईश्वराशीच बोलत आहेत आणी गुरुदेवांच्या हृदयवीणेचे झंकार आसमंतात निनादात आहेत, असे वाटते.

हे स्थान शांत-प्रशांत..., आनंदमय. सक्षात येथे गौरीकुमार | सत्यम शिवम सुंदरम || आळंदीचे नरसिंह सरस्वती, पद्मालयचे श्री गोविंद महाराज, नशिराबादचे सिद्धयोगी श्री झिपरूअण्णा या महात्म्यांनी श्री तरसोद गणपतीचे दर्शन घेतले आहे. परमपूज्य श्री झिपरू अण्णांचे तर या परिसरात भ्रमण असे. तरसोद श्री गणेशाचे दर्शन घ्यायला आलेल्या भाविकाचे येथे पदार्पण होताच त्याचे मनोविकार लोप पावतात. षड्रिपू तर दूर पळतात. श्रींची विधिवत पुजा-अर्चा झाल्यावर भक्त प्रार्थना करतात.

तरसोद पुण्यक्षेत्री या | प्रसन्न हो मजवर आता | शरण अनंता तुज येता | दे आशिष मज भगवंता ||

तरसोद येथील श्री गणपती मंदिर ऐतिहासिक असून नशिराबाद पासून अवघ्या ३ किमी वर आहे. हे गणपती मंदिर सन १६६२ मध्ये मुरारखेडे येथील मोरेश्वर हणमंत देशपांडे यांनी बांधले. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते झाला आहे. हे मंदिर जागृत देवस्थान असून दर्शनासाठी रोज भक्तगणांची गर्दी होते. गणेशाची मनोभावे आराधना करणारे नशिराबादचे भाविक संकष्ट चतुर्थीला पद्मालय येथे दर्शनास जात. पद्मालय देवळासमोर श्री गोविंद महाराजांच्या पादुका आहेत. सन १९१५-१९३४ या काळात हे सिद्धपुरुष तेथे वास्तव्य करीत असत. त्यांनी पद्मालय मंदिराचा जीर्णोद्धार केला. एवढ्या लांबवरुन नशिराबादचे भाविक पद्मालायास गणेश दर्शनास येतात हे सिद्धपुरुष जाणत असत. सहसा ते कोणाशी बोलत नसत. पण अचानक या भाविकांना त्यांनी सांगितले कि, पद्मालायाचे पूर्ण स्वरूप नशिराबाद जवळील तरसोद येथे आहे. त्या दिवसापासून भाविक तरसोद गणपती मंदिरात जाऊ लागले.