प.पु.श्री झिपरू अण्णा महाराजांचे अनुभव

पपु झिपरू अण्णा महाराज सोनगीर, जिल्हा-धुळे येथे श्री गुरुगोविंद महाराज यांच्या समाधी दर्शनास जात होते. त्यावेळी श्री मधुसूदन महाराजांना अण्णा महाराजांचा साक्षात्कार झाला. वैशाख महिन्यात भर दुपारी १२:३० ला झिपरूअण्णा महाराज हे मधुसूदन महाराजांना भेटले. पेटी उघड म्हणून काशीबाईस सांगितले. त्यात फुटाने होते व आसनाखालुन बिड्या काढून दिल्या व अदृश्य झाले. त्याचप्रमाणे सोनगीरचे गादिपती श्री केशव दत्त महाराज व मधुसूदन महाराज दोघे नशिराबादला झिपरूअण्णा महाराजांच्या भेटीस आले होते. झिपरूअण्णा नदीकाठी विवस्त्र अवस्थेत घाणीच्या जागेत व उकिरड्यावर बसले होते. त्याच अवस्थेत अण्णा महाराज – केशवदत्त महाराज यांचे बोलणे सुरु झाले. सोनागीरची गादी सांभाळ असे अण्णा महाराजांनी सांगितले. नंतर त्यांनी अण्णा महाराजांना भजे व चहा दिला. अण्णा महाराजांनी केशवदत्त महाराजांना जोरात लाथ मारली व ते बेशुद्ध झाले. एक तासाने केशवदत्त महाराज शुद्धीवर आले. तेव्हा झिपरू अण्णा महाराज, मधुसूदन महाराज व केशवदत्त महाराज हे तिघेजण जोरात खळखळून हसू लागले. विशेष म्हणजे घन जागेतही केशवदत्त महाराज व मधुसूदन महाराज यांच्या स्वच्छ सफेद पोशाखावर थोडासाही मातीचा डाग दिसून आला नाही.

तसेच भुसावळच्या मुस्लीम संत खालम्मा, केशवदत्त महाराज व झिपरू अण्णा महाराज यांनी मिळून अध्यात्मिक व समाज जागृतीचे महान कार्य सन १९४० च्या सुमारास केले होते.

सोनगीर (जि-धुळे) येथील आनंदवन संस्थानाचे गादिपती श्री हभप डॉ. मुकुंदराज महाराज सन १९९६ मध्ये झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी सुमारे तासभर बसले तेव्हा साक्षात अण्णा महाराज यांचे दर्शन झाले. मनःशांती मिळाली असा प्रत्यक्ष अनुभव डॉ. मुकुंदराज महाराज यांनी सांगितला. झिपरूअण्णा महाराज समाधी मंदिराचे विश्वस्त सुरेश रामदास अकोले यांचे गुरु डॉ. मुकुंदराज महाराज आहेत. त्यांनी दृष्टांत सांगितला व झिपरूअण्णा महाराज यांची ख्याती व दृष्टांत बरेच आहेत असे सांगितले. मनःशांतीचा लाभ व मनोकामना सिद्धीस नेण्यासाठी झिपरूअण्णा महाराजांचे नामस्मरण उत्तम आहे.